६. मायेची पाखर -संपूर्ण पाठ | 6. Mayehi Pakhar - Sampurn Path

 ६. मायेची पाखर 



कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे . एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो . भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो . त्यांची भेट झाली . मला खूप समाधान वाटले . सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत . अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले . संस्था पाहून झाली . अंधार पडला , रात्र झाली . ' आता इथंच मुक्काम करा ! ' अण्णांनी मला आग्रह केला . अण्णांचा तो आग्रह ! नाही कसे म्हणायचे ? राहिलो झाले तिथे . मी संस्थेचा परिसर पाहत निघालो . संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते . आजूबाजूलाही गर्द झाडी होती . थंडीचे दिवस होते . कडाक्याची थंडी पडली होती . मुले पत्र्याच्या खोल्यांतून राहत होती . पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते . मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो . त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला . ' नुकतंच जेवण झालंय माझं , ' असे मी त्यांना सांगितले . अर्थात हे सर्व खोटेच होते . वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार ! म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली . मुलांची जेवणे झाली , प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली . माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते . मग मला झोप कशी येणार ? मी तसाच पडून राहिलो . अण्णांनी हे ओळखले . त्यांनी एका मुलाला आज्ञा केली , “ जा रे , स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू ! ' ' मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला . पिठले , भाकरी , कांदा , तेल एका ताटात घेऊन आला . मग काय , मी अधाश्यासारखा त्यावर तुटून पडलो . पंचपक्वान्नांपेक्षाही ते मला रुचकर लागले .  बिछान्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला . मध्यरात्र उलटून गेली . कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली . अण्णा उठले होते . त्यांनी कंदील हातात घेतला . प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही , त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही ते अण्णा पाहू लागले . त्यांनी पाहिले , की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे . अण्णा त्याच्याजवळ गेले . त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगत उचलले . स्वतःच्या बिछान्यावर आणून झोपवले . स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली . त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले . त्या उबेत तो मुलगा गाढ झोपी गेला . त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती . कितीतरी जणांना वडील नव्हते ; पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता . अशी होती अण्णांच्या मायेची पाखर . हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले . 



सकाळी मी उठलो . अण्णांना कडकडून भेटलो . नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले , " अण्णा , आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात . या मुलांचेच नव्हे , तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात . आपणांस उदंड आयुष्य मिळो ! " अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले . रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या , उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली . शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण ' कर्मवीर ' म्हणून ओळखतात . - पां . चिं . पाटील ( मायेची पाखर - पक्षी मायेपोटी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात , तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलावर भाऊराव पाटील यांनी जिवापाड प्रेम केले . ) 


शब्दार्थ : पोटात कावळे ओरडणे - खूप भूक लागणे . अधाशी - हावरा , खादाड . रुचकर- चवदार . बिछाना - अंथरूण , थंडीने कुडकुडणे - खूप थंडी वाजणे . पोटाशी धरणे - मायेने जवळ घेणे . ऊब - उष्णता . मायेचा वर्षाव करणे- खूप प्रेम करणे . उदंड - खूप , पुष्कळ ,