पाठ-सातवा - स्वराज्याचे तोरण बांधले

 रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली , पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मुघल बादशाह , विजापूरचा आदिलशाही सुलतान , गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या . या सत्तांचा दरारा मोठा होता . त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती . अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता . कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! पण शिवरायांचा निश्चय अढळ होता . त्यातूनच बळ निर्माण झाले . तोरणगड : शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती . जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते . किल्ल्यांशिवाय कसले स्वराज्य ! ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला , की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते . डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार . तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे , असे शिवरायांनी मनाशी ठरवले . तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता . पुण्याच्या नैर्ऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे . डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका . त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या . एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची . माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी . झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे , लढाऊ आहे .

किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे . ती आहे झुंजार माचीवरून . ही वाट अतिशय अवघड आहे . वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांत तोरणा किल्ला गणला जातो . किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे . त्यावरून त्या किल्ल्याला ' तोरणा ' हे नाव पडले . एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते . किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते , की दारूगोळा नव्हता . शिवरायांनी हे हेरले . शिवरायांना नेमके हेच होते . तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे , असे त्यांनी ठरवले . स्वराज्याची नौबत झडली : निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले . साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले . मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या . तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले . येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी . त्याने चौकीवर पहारे बसवले . किल्ला ताब्यात आला . सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला . हिंदवी स्वराज्याची नौबत झडली . नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमला . शिवरायांनी या किल्ल्याला ' प्रचंडगड ' असे नाव दिले . भवानीमातेचा आशीर्वाद : तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला . त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली . किल्ल्यावर मराठा किल्लेदार , ब्राम्हण सबनीस , प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका " केल्या . शिबंदीत मावळे , कोळी , रामोशी , महार इत्यादी जातीजमातींतील शूर माणसे नेमली . स्वराज्याच्या सैन्यात जातिभेद , वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता . किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य ! मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी , काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या ! कामकऱ्यांना आनंदीआनंद झाला . ' शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे , तिनेच धन दिले ' , असे जो तो म्हणू लागला . कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या . एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही . स्वराज्याचे धन होते ते ! ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले . . स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला . आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे , असे त्यांना वाटले . हे धन स्वराज्याच्या कामी आले . या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली . दारूगोळा जमा केला . उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले . तो बेत असा . तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे . शिवरायांनी तो हेरून ठेवला होता . हा डोंगर खूप उंच , अवघड आणि मोक्याचा होता . आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता . या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता , तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा , असे शिवरायांनी ठरवले . स्वराज्याची पहिली राजधानी : एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला . तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले . शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले ' राजगड ' . गडावर पाथरवटांनी दगड घडवले . लोहाराने भाता फुंकला . सुतार , गवंडी , मजूर , भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली . राजवाडा , बारा महाल , अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली . राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली . स्वराज्याची घोडदौड : शिवरायांची घोडदौड सुरू झाली . बारा मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले . बारा मावळांत आनंद आणि उत्साह यांना पूर आला . गावोगावचे पाटील , देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले ; परंतु तांदळात जसे काही खडे असतात , तसेच मावळांतही काही दुष्ट लोक होते . शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले . शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या . ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशाहाच्या कानी घातली . शिवरायांचे चातुर्य : आदिलशाहा चकित झाला . त्याने शहाजीराजांना जाब विचारला . शहाजीराजांना मोठा पेच पडला , पण त्यांनी वेळ निभावून नेली . ' जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वत : कडे एकही किल्ला नाही , म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा , ' असे शहाजीराजांनी आदिलशाहास कळवले . शिवरायांनीही आदिलशाहाकडे जासूद पाठवला . ' जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला . आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला . यात दुसरा काहीही हे नाही . ' असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले . कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते . शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले . त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला . स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली .